वैद्यकीय व्यवसाय सांभाळत डॉ. लिली जोशी यांनी अनेक वर्षे प्रवासाचा छंद जपला आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळांपुरती मर्यादित न राहता वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे अनुभवण्याकडे त्यांचा कल आहे. ‘पर्यटन एक संजीवनी’ या पुस्तकात त्यांनी आपल्या विविधांगी प्रवासानुभवांचे रंजक वर्णन केले आहे. गाडीने केलेली स्कॉटलंडची भटकंती, रेडवूडच्या जंगलातील सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय देशांतील पर्यटन असे अनेक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात.
हे पुस्तक केवळ प्रवासवर्णनापुरते मर्यादित नाही. ‘गुगल’ आणि ‘हार्वर्ड स्कूल’ यांसारख्या व्यावसायिक स्थळांना दिलेल्या भेटींचे अनुभव तसेच चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रवासवर्णने त्या देशांतील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विविध पैलू उलगडतात. काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप आणि योसेमिटी येथील ट्रेक्समधील थरारक अनुभव साहसाची रोमांचक अनुभूती देतात. एक डॉक्टर म्हणून लेखिकेने पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीचाही विचार मांडला आहे. प्रवासामुळे दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा दूर होऊन नवा उत्साह, ऊर्जा आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन मिळतो, हा विचार पुस्तकातून प्रभावीपणे व्यक्त होतो. पर्यटन हे केवळ विरंगुळ्याचे साधन नसून आयुष्य समृद्ध करणारी संजीवनी आहे, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक प्रवासप्रेमींना नवनवीन ठिकाणे अनुभवण्याची प्रेरणा देते.






Reviews
There are no reviews yet.